महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतकांनी केरळमधील आपत्तीग्रस्तांसाठी जमा केलेला १४ लाख ११ हजार रुपये निधी आज (शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर २०१८) रा.स्व. संघ जनकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा निधी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा अँड. अलकाताई पेठकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

या वेळी जनकल्याण समितीचे सहकार्यवाह विनायकराव डंबीर, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, विनय चाटी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर तसेच पुण्यातील संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक उपस्थित होते. 

विशेष म्हणजे मयूर कॉलनीतील मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ. ९ वीत शिकणाऱ्या अनिश सांगवीकर या विद्यार्थ्याने त्याला मिळालेली शिष्यवृत्तीची सर्व रक्कम केरळ आपत्तीग्रस्त निधीसाठी दिली आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने याशिवाय ३.५० लाख रुपयांचा मदतनिधी महाराष्ट्र शासनाकडे जमा केला आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आत्तापर्यंत विविध प्रसंगी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा प्रकारचा निधी संकलित केला असून जनकल्याण समितीच्या माध्यमातून हा निधी केरळमधील बांधवापर्यंत पोहोचवण्याची संधी संस्थेला मिळाल्याबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आनंद व्यक्त केला. 

केरळमध्ये सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती विनायकराव डंबीर यांनी यावेळी उपस्थितांना दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन आंबर्डेकर यांनी केले.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी सादर केलेली नेत्रदीपक प्रात्यक्षिके पहाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. या प्रात्यक्षिकांचे नेतृत्व दिव्या निखाडे, पलक मिठारी, वैष्णवी जोशी या विद्यार्थिनींनी केले. शनिवार पेठेतील मेहुणपुरा मित्रमंडळाच्या केळकर रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीत शाळेने सहभाग घेतला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. २३सप्टेंबर २०१८ रोजी दु. ३.३० वाजता ही मिरवणूक निघाली होती. त्यामध्ये शाळेच्या १२ विद्यार्थिनींनी रोप मल्लखांब आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांसाठी एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आवश्यक रचना उभी करण्यात आली होती. त्याआधारे विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबाची क्रॉस, पतंगी, गौराई, शवासन, साधी आढी, निद्रासन, वादी, पश्चिमोतासन इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली. योगासन प्रकारात चक्रासन, वृक्षासन, गरुडासन, नटराजासन आणि एकपादशिरासन अशी अनेक आसने दाद मिळवून गेली. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रचंड गर्दी आणि ढोल-ताशांचा गजर , डीजेंचा दणदणाट अशा वातावरणात विद्यार्थिनींची एकाग्रता, आत्मविश्वास आणि लवचिकता सर्वांनाच अचंबित करणारी होती. विद्यार्थिनींची प्रात्यक्षिके पाहून मुख्य चौकामध्ये उपस्थित असलेल्या पुण्याच्या पोलीस उपायुक्त श्रीमती भानुप्रिया सिंग (आयपीएस अधिकारी) यांनी व्यासपीठावर बोलावून फूल देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले आणि आस्थेने विचारपूस करून शाळेला आवर्जून भेट देण्याचे आश्वासन दिले. 

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत प्रात्याक्षिकांचे सादरीकरण व्हावे ही संकल्पना प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी मांडली. त्यानुसार लागणाऱ्या साहित्याची जमवाजमाव व सराव करण्यात आला. अफाट जनसमुदायासमोर जाताना विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि चालत्या ट्रॅक्टरवर उभारण्यात आलेल्या रचनेवर करावे लागणारे सादरीकरण ही आव्हाने समोर होतीच, परंतु विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि सर्व टीमचा पाठिंबा यामुळे ही सर्व आव्हाने लीलया पेलता आली. प्रशालेच्या दोनही महामात्र डॉ. मानसी भाटे आणि श्रीमती चित्रा नगरकर यांनी दिलेली प्रत्यक्ष भेट टीमचा उत्साह वाढविणारी ठरली. 

या प्रात्यक्षिकांसाठी प्रशालेचे कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त), उपप्राचार्य अनंत कुलकर्णी यांनी बहुमोल योगदान दिले. तसेच प्राचार्या श्रीमती पूजा जोग, शाम नांगरे, संदीप पवार, गुणेश पुरंदरे, माळी सर, थोरात सर, जगदाळे सर, अद्वैत जगधने, श्रीमती महाले यांचाही सक्रिय सहभाग होता.

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव सहस्रबुद्धे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. माधव भट यांची तसेच संस्थेचे सचिव म्हणून डॉ. भरत व्हनकटे यांची आणि सहाय्यक सचिव म्हणून श्री. सुधीर गाडे यांची निवड करण्यात आली. आज (दि. १९ सप्टेंबर) झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 

संस्थेची वार्षिक साधारण सभा शनिवार, दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. यशवंत वाघमारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच श्री. प्रदीप नाईक यांची नव्याने उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय संस्थेच्या नवीन नियामक मंडळामध्ये सर्वश्री राजीव सहस्रबुद्धे, अभय क्षीरसागर, डॉ. माधव भट, डॉ. माधवी मेहेंदळे, आनंद कुलकर्णी, देवदत्त भिशीकर, सौ. आनंदी पाटील, धनंजय खुर्जेकर व विजय भालेराव यांची निवड करण्यात आली. 

२०१८ ते २०२३ या कालावधीसाठी या सर्वांची निवड करण्यात आली आहे.

© 2016

Search