महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या विद्यार्थीनींनी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रिकर यांना शनिवार,दि. ३० जुलै २०१६ रोजी मानवंदना दिली. श्री. पर्रिकर एका कार्यक्रमासाठी संस्थेच्या मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात आले होते. त्यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल(निवृत्त) श्री.भूषण गोखले, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे, नियामक मंडळ सदस्या आणि शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं या वेळी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सैनिकी शाळेतील विद्यार्थीनींच्या भवितव्याच्या दृष्टीने मागण्यांचे एक निवेदन त्यांना दिले. सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी लष्कराच्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत (OTA – Officer’s Training Academy) काही जागा राखीव ठेवण्याबाबत आपण विचार करू असं पर्रिकर यांनी या वेळी सांगितलं.
म.ए.सो. ची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही निवासी शाळा असून राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थीनी इ. ५ वी ते इ. १२ वीचे शिक्षण घेत आहेत. शाळेच्या सध्याच्या मंजूर शुल्क रचनेत बदल करण्याची तसेच या विद्यार्थीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. शाळेत कठोर लष्करी प्रशिक्षण घेऊनही या विद्यार्थीनींना संरक्षण दलात थेट प्रवेश मिळण्याची कोणतीही योग्य संधी उपलब्ध नाही. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी त्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागत आहे. परिणामी शाळेचा मूळ उद्देशच बाजूला पडत आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती संस्थेनं दिलेल्या निवेदनात संरक्षण मंत्र्यांना केली आहे.
लष्करी प्रशिक्षणाबरोबरच यथोचित शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने इयत्ता १२ वी नंतर या विद्यार्थीनींच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सातत्य राहात नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं सहकार्य आणि मार्गदर्शन केल्यास या विद्यार्थ्यीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या पुढील अभ्यासक्रमांसाठी नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे आव्हान स्वीकारण्यास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तयार आहे, असं संरक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय मुलांच्या सैनिकी शाळेप्रमाणेच मुलींच्या सैनिकी शाळेलाही केंद्र सरकारने विविध योजनांमधून वेतनेतर अनुदान द्यावे, विशेष बाब म्हणून शाऴेमधे एन.सी.सी. युनिटला मान्यता द्यावी, क्रीडा विषयक सोयी-सुविधांसाठी केंद्र सरकारनं आर्थिक सहाय्य द्यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

“शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, खोड्या, मारामाऱ्या मला आज आठवत आहेत. आज मला जे प्रेम, जिव्हाळा मिळाला तो अनमोल आहे, त्याबद्दल मी आभार मानणार नाही, तो मी ह्रदयात जपून ठेवत आहे. पुनर्जन्म मिळाला तर मी पुण्यातच जन्माला येईन आणि भावे हायस्कूलचाच विद्यार्थी होईन,” अशा शद्वात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होतं बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95 व्या वाढदिवसाचं. 29 जुलै 1922 हा बाबासाहेबांचा जन्मदिवस. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं शिक्षण झालं. ते ज्या वर्गात शिकले त्याच वर्गात शाळेनं आपल्या या माजी विद्यार्थ्याचा आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता. शाळेतील यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के. एन. अरनाळे आणि सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे उपस्थित होते.
शाळेतील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी (एन.सी.सी.) मानवंदना देऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शाळेच्या आवारात स्वागत केलं. त्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी बाबासाहेबांचे औक्षण केले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेब ज्या वर्गात शिकले त्या वर्गापर्यंत पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापकांच्या खोलीच्या शेजारच्याच खोलीत बाबासाहेबांचा वर्ग होता. तिथे वेदमंत्रांच्या उच्चारांनी बाबासाहेबांने अभिष्टचिंतन करण्यात आले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील जिवंत देखावा साकारून बाबासाहेबांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या राष्ट्रपुरूषांच्या प्रसिद्ध घोषवाक्यांचा जयजयकार या विद्यार्थ्यांनी या वेळी केला. “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीति ...” हे स्फूर्तिगीत यावेळी या विद्यार्थ्यांनी सादर केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांनीच लिहीलेल्या ‘हिरकणी’ या कथेची समिक्षा सौ. रमा लोहोकरे यांनी सादर केली आणि त्यानंतर या कथेचे अभिवाचन शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पुरंदरे, सौ. गौरी पुरंदरे, सौ. प्रमिला सातपुते, अतुल दळवी आणि सौ. सुनीता खरात यांनी केले. हा सर्व कार्यक्रम बाबासाहेब अत्यंत तन्मयतेने अनुभवत होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, “ही कथा ऐकत असताना मी मनाने रायगडावरच होतो. आजपर्यंत मी जे काही केलं आहे ते शाळेनं केलेल्या संस्कारामुळेच करू शकलो आहे. मी 95 वर्षांचा झालो असलो तरी शाळेनं आज दिलेलं प्रेम, जिव्हाळा पाहून मला लहानच राहावं असं वाटतं आहे. आजचा हा आगळावेगळा सोहळा पाहून मी थक्क झालो आहे. आज इतक्या वर्षांनी मी शाळेच्या या वेगळ्याच जगात आलो आहे. देवानं मला विचारलं तर मला पुन्हा या पुण्यातच जन्माला यायचं आहे आणि भावे हायस्कूलमध्येच शिकायचं आहे. शाळेतल्या अनेक घटना अजूनही मला आठवत आहेत. शाळेतल्या लेले सरांनी भूगोल शिकवताना हे विश्व किती मोठं आहे आणि आपण त्यात किती कणभर आहोत हे सांगतानाच आपल्यातही आकाशाएवढं होण्याची क्षमता आहे हे लक्षात आणून दिलं होतं. त्यामुळे खूप शिका, खूप दंगा करा, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि आज माझ्यावर केलंत तसंच शिवचरित्रावर प्रेम करा.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के.एन. अरनाळे यांच्या हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आलं. तसंच मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षकांच्या वतीने श्री. पी. के. कुलकर्णी यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं सासवड येथे वाघीरे विद्यालयाच्या आवारात स्थापन केलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड या इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १५ जुलै २०१६ रोजी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी या शाळेत प्रवेश घेतलेल्या छोट्या दोस्तांच्या समवेत केले.
सासवडमधील पालकांचा संस्थेशी दीर्घकाळापासून परिचय असल्याने संस्थेची ही शाळा, इंग्रजी माध्यमाची असली तरी या शाळेत भारतीय परंपरेनुसारच संस्कार होतील असा विश्वास पालकांनी या वेळी व्यक्त केला.
या आनंद सोहळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, संस्थेचे सचिव मा. डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य मा. भालचंद्र पुरंदरे, मा. शामाताई घोणसे, संस्थेच्या आजीव मंडळाचे सदस्य आणि म.ए.सो. वाघीरे प्रशालेचे महामात्र मा. अंकुर पटवर्धन, मा. श्रीमती सविता काजरेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जगदीश मालखरे, माजी आजीव सदस्य मा. वि. ना. शुक्ल, मा. आर. व्ही. कुलकर्णी, आणि वाघीरे शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन इमारतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेला शुभेच्छा दिल्या आणि शाळेची सूत्रे समन्वयक श्रीमती शलाका गोळे यांच्याकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख श्रीमती मेघा जांभळे यांनी केले.

सोमवार दि.27/03/17 रोजी कालीदास कलामंदिर, नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार वर्ष 2015-16 व 2016-17 साठी एकत्रित देण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची 156 वर्षांची उज्वल परम्परा  व आदिवासी मुली- मुलांसाठी संस्थेने दिलेले योगदान,त्याच बरोबर देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी प्रशालेमध्ये गिरिकन्याना मिळत असणारे सैन्य प्रशिक्षण  व त्यांचे सक्षमीकरण या सर्वाचा विचार करुन शासनाने सदर पुरस्कार सैनिकि प्रशालेस दिला.
सदर पुरस्कारामध्ये 50,001/- रु. धनादेश, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ इत्यादीचा सामावेष होता.
सदर पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री.विष्णु सवरा तसेच ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे, मा.मनिषा वर्मा सचिव ,आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन तसेच नाशिकच्या प्रथम नागरिक व महिला महापौर मा.रंजनाताई भानसी  आदि मान्यवार उपस्थित होते.महराष्ट्रातील 16 व्यक्तीना व 7 संस्थाना आदिवासी सेवक व सेवा  संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी सेवक संस्था कार्यकर्ते उपस्थित होते. म ए सोसायटी तर्फे श्रीमती चित्रा नगरकर तसेच सैनिकि प्रशालेतर्फे प्राचार्या पूजा जोग, उप-प्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी यानी सदर पुरस्कार स्विकारला. या देखण्या व भव्य-दिव्य कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक श्री.राजीव जाधव यानी केली. सदर पुरस्कार सैनिकी प्रशालेस मिळाल्याने संस्था पदधिकारी व समाजातून प्रशालेच्या कामाचे कौतुक होत आहे.

© 2016

Search