“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इ.स. २०२० मध्ये १६० वर्षे पूर्ण करीत आहे आणि त्याचवेळी देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. या ‘तरुण भारता’ला संस्कारांबरोबरच कौशल्य शिकविण्याची जबाबदारी ‘मएसो’वरच आहे,” असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी ज केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५८ व्या वर्धापनदिनानिमित्त आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. “आज आपण प्रकाशित केलेल्या संस्थेच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये बुद्धी, शक्ती आणि युक्तीचा विकास करण्यासाठी संस्था करत असलेल्या विविध उपक्रमांचा संगम दिसून येतो आहे. संस्थेने आता स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याचा विचार करायला हवा. त्यामुळे संस्थेच्या कार्याचा चांगल्याप्रकारे विस्तार होईल. संस्थेच्या सर्व शाखांच्या विचारांचा आधार हा संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट असले पाहिजे. आपण करीत असलेल्या कामाचे सिंहावलोकन करण्याची ही योग्य वेळ आहे. ‘मएसो’चा परिवार झोकून देऊन काम करीत आहे. त्यामुळे संस्था भविष्यकाळात मोठी वाटचाल करेल. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेची - MAA- ची वाटचालदेखील जोमाने सुरू आहे. MAA च्या उपक्रमांसाठी ‘क्राऊड फंडिंग’ होणे आवश्यक आहे. विविध माध्यमातून मिळणारा निधी संस्थेकडे जमा झाल्यास त्याचा उपयोग गरज असलेल्या शाखांमद्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी करता येऊ शकेल. संस्थेचे कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ब्रँड प्रमोशन आणि सोशल मिडियाचा वापर वाढविला पाहिजे,” असेही भूषणजी गोखले म्हणाले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेचे माजी सचिव मा. आर.व्ही. कुलकर्णी व प्रा. वि.ना शुक्ल आदी मान्यवर तसेच संस्था कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सरस्वती पूजनानंतर संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सरस्वती वंदना झाल्यानंतर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “दरवर्षी आपण आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमातून संस्थेच्या कार्याचा वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करीत असतो. भविष्यकाळाच्या दृष्टीने महत्वाची ठरतील अशी तीन प्रकाशने आजच्या कार्यक्रमात आपण करणार आहोत. विविध अभ्यासविषयांची महाविद्यालये सुरु करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्था वृद्धिंगत व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया!” आजच्या कार्यक्रमात संस्थेचे इ.स. २०३०पर्यंतचे व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन मा. गोखले यांच्या हस्ते तर ‘म.ए.सो. २०१८ स्मरणिका’चे प्रकाशन मा. नाईक यांच्या हस्ते आणि संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मराठी भाषेतील माहितीपटाचे मान्यवरांच्या हस्ते सामुहिक प्रकाशन करण्यात आले. आज प्रकाशित झालेल्या या तीनही साहित्याच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात योगदान देणारे विशेष निमंत्रित गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक शेखर पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “सन २००८मध्ये गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले होते. त्यावेळचे सहकारी यावेळीही बरोबर असल्याने संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे सुकर झाले. महाविद्यालयाच्या व्हिजन डॉक्युमेंटचे स्वरुप तुलनेने मर्यादित होते परंतु संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट व्यापक स्वरुपाचे असल्याने मांडणीच्या दृष्टीने नेमकी निवड करणे आवश्यक होते. त्यासाठी संस्थेचा इतिहास आणि घटना इत्यादींचा विचार करावा लागला, विविध शाखांना भेटी दिल्या. व्हिजन डॉक्युमेंटचा प्रथम आराखडा कसा असावा याबाबत मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी या कामासाठी खूप वेळ तर दिलाच पण त्यांनी केलेल्या मौलिक सूचनांमुळे व्हिजन डॉक्युमेंट आवश्यक उंची गाठू शकले. मा. भूषणजी गोखले यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. डॉ. आनंद लेले, डॉ. भरत व्हनकटे, डॉ. केतकी मोडक आणि डॉ. संतोष दशपांडे यांचे सहकार्य लाभले. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो, कारण मी ‘मएसो’ला गुरु मानतो, १९८० साली गरवारे वाणिज्य महाविद्यालयात रुजू झालो तेव्हा मा. चिरमुले आणि गोखले सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि संस्थेचे काम कसे करायचे हे शिकायला मिळाले. ते ऋण फेडण्याची संधी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या निमित्ताने मला मिळाली.” संस्थेचे माजी सचिव आर. व्ही. कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले, “१९९० सालपर्यंत २ महाविद्यालये आणि ७ शाखा असा विस्तार असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने १९९० सालपासून वेगाने केलेली प्रगती बघून आनंद वाटतो. संस्थेचे कार्य अशाच गतीने पुढे जात राहील आणि भव्य स्वरुप प्राप्त होईल. या संस्थेशी निगडित असल्याचा आनंद वाटतो. संस्थेला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा!” मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, “संस्थेच्या नियामक मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना गेल्या तीन वर्षात काही गोष्टी प्रकर्षाने जाणविल्या, त्या म्हणजे सरकार दरबारी आणि प्रसिद्धी माध्यमात संस्थेबाबत फारशी माहिती नाही तसेच विविध शाखांमधील माजी विद्यार्थ्यांनादेखील मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल अज्ञान आहे. त्यादृष्टीने विविध उपक्रम, प्रयत्न करण्याची आवश्यकता लक्षात आली. शालेय तसेच महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षणामध्ये समतोल साधण्याची गरज आहे, संस्थेच्या विस्तारात हा समतोल साधण्यात आपण यशस्वी होऊ. यापुढील काळात सरकारवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची गरज आहे. गरजू आणि गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण विद्यादान निधी योजना सुरू केली असून अल्पावधीतच त्याला भरघोस यश मिळाले आहे. २०२० हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे कारण त्यावर्षी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची १७५ वी जयंती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व मएसो मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) या शाळेचा शतकोत्तर हीरक महोत्सव व मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा अमृत महोत्सव आहे.” संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक यांनी आपल्या मनोगतात, अधिकाधिक स्वावलंबी होण्याचे संस्थेचे ध्येय अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. तर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. वाघमारे यांनी संस्थेच्या वेगवान प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-वार्तापत्र आणि स्मरणिकेबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुधीर दाते यांनी ‘मएसो’वरील स्वरचित कविता उपस्थितासमोर सादर केली. संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमानंतर म.ए.सो. मुलांचे विद्यालय येथे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मल्लखांब व रोलबॉल स्केटिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मा. भूषणजी गोखले आणि मा. प्रदीपजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंनी यावेळी रोलबॉल स्केटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर मा. भूषणजी गोखले यांनी या खेळाडूंशी संवाद साधला.

 

 

 

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'शौर्य' या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कर्नल दिनार दिघे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे उपस्थित होते. "शौर्य शिबिरामुळे स्वावलंबन, संघटन कौशल्य व आत्मविश्वास हे गुण वाढण्यास निश्चितच उपयोग होईल," असे सांगून पाल्यांना साहसी क्रीडा प्रशिक्षणासाठी पाठवल्याबद्दल कर्नल दिघे यांनी पालकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधून चालणाऱ्या शैक्षणिक कार्याबरोबरच विविध उपक्रमांची माहिती प्रा. आपटे यांनी दिली. ‘मएसो’ येत्या १९ नोव्हेंबर रोजी १५९ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण प्रा. भोसले यांनी उपस्थितांना दिले. सैनिकी शाळेतर्फे दि. १२ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये रिव्हर क्रॉसिंग, राफ्टिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, आर्चरी, वॉल क्लायंबिंग इ. साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुटीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात येते. अशा स्वरुपाचे हे ७ वे शिबिर आहे. यावेळच्या शिबिराचे एक वैशिष्टय म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच राजस्थानमधील प्रशिक्षणार्थीदेखील त्यात सहभागी झाले आहेत. सैनिकी शाळेची शाला समिती, शौर्य शिबिराची संयोजन समिती व म.ए.सो चे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येते.

त्रिदल पुणे (पुण्यभूषण फाऊंडेशन) च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'पक्के पुणेकर' सन्मानाने यावर्षी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा गौरव करण्यात आला. पुण्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मोलाचे कार्य करून शंभर वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पुणेकरांच्या वतीने 'मएसो'ला सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य अॅड. धनंजय खुर्जेकर आणि संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी संस्थेच्या वतीने रमेश शहा (लायन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या या गौरव सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ सतीश देसाई, युवराज शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील इंग्लिश मिडियम स्कूलचे म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूल असे नामकरण माजी केंद्रीय मंत्री आणि मएसोचे माजी विद्यार्थी मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते सोमवार, दि. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार, म.ए.सो.चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, कै. हरिभाऊ देशपांडे यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. अजितराव देशपांडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा.गोविंद कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सौ. प्रतिभाताई पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, डॉ. रजनीताई इंदुलकर, म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाळा समितीचे सदस्य प्रा. सुधीर भोसले व श्री. बाबासाहेब शिंदे, स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच सर्व पवार व देशपांडे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मा. शरद पवार म्हणाले की, “ शाळेत उत्तम शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची योजना करण्याबरोबरच शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवाद ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची परंपरा आहे. बारामतीतील अनेक पिढ्या घडवण्याचे काम संस्था अविरतपणे करत आहे. हरिभाऊ देशपांडे देखील याच मुशीत घडले. शिक्षणाच्या विस्तारासाठी त्यांनी मुक्तहस्ते दानदेखील दिले. बारामतीमधील सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आपली संपत्ती समाजासाठी देण्याची इच्छा त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली. अशा हरिभाऊ देशपांडे यांचे नाव या शाळेला देण्यात आले याचा मला आनंद आहे. म.ए.सो.च्या शाळेत मला देखील उत्तम संस्कार आणि शिस्तीचे धडे मिळाले. मी जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालो, याचे श्रेय माझी शाळा व माझी आई यांना आहे. आम्हा तीन भावडांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाले आहेत. एकाच आईच्या तीन मुलांना आणि ‘मएसो’च्या एकाच शाळेतील तीन माजी विद्यार्थ्यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले याचा अभिमान वाटतो.” कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष मा. धनंजय खुर्जेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “वाढती विद्यार्थी संख्या आणि कालानुरुप शिक्षण पद्धती यांचा मेळ घालण्यासाठी शाळेच्या वास्तुचा विस्तार करण्यात आला आहे. स्वावलंबी आणि कौशल्ययुक्त पिढी घडवण्यासाठी शाळेत सातत्याने विविध उपक्रम सुरु असतात. कै. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वामुळेच हे शक्य झाले आहे, त्यामुळे त्यांचे ऋण कधीही फेडता येणार नाहीत.” अजित देशपांडे आपल्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, “ देशपांडे कुटुंबीय आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्यातील संबंध घनिष्ट आहेत. शाळेतील गुरुजनांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले त्यामुळेच आम्ही सर्व भावंडे आणि शाळेतील विद्यार्थी घडलो. माझे वडील हरिभाऊंचे वर्णन ‘पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा’ असे करता येईल. त्यांना कलाकारांबद्ल अतिशय जिव्हाळा होता. भाऊंच्या सामाजिक कार्यात मा. शरद पवार यांचे सहकार्य असायचे, त्या दोघांचे संबंध अत्यंत स्नेहपूर्ण होते. वडिलांकडून मला आवाजाची देणगी मिळाली, त्यामुळेच मी आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांमध्ये यशस्वी होऊ शकलो.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “बारामतीकरांचे म.ए.सो. वर खूप प्रेम आहे, त्यामुळेच येथील संस्थेच्या शाळा प्रगती करत आहेत. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वातूनच ही शाळा उभी राहिली आहे. त्यांनी आईची भूमिका पार पाडली आहे, त्यांचे आशीर्वाद शाळेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देशाचे सक्षम नागरिक बनवण्याची जबाबदारी आता शाळेवर आहे आणि अशाप्रकारे सक्षम झाल्यावरच शाळेतील विद्यार्थ्यांना मा. हरिभाऊ देशपांडे यांच्या कार्याची महती कळेल. पुढील पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.” शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘मएसो गीत’ व शेवटी पसायदान सादर केले. 

 

© 2016

Search