मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या पाच छात्रांची यावर्षी राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी निवड झाली आहे. ऐश्वर्या खैरनार, आसावरी तानवडे, रितीका जाधव, मंगेश गोळे आणि आकाश थोपटे हे ते छात्र आहेत. एन.सी.सी. च्या पुणेस्थित २ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.पी.एस. मौर्य तसेच कर्नल एस. नारायनील आणि कॅप्टन संदीप नवले यांचे या छात्रांना विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. गेल्या सलग सात वर्षांपासून या महाविद्यालयातील छात्रांची राजधानीतील संचलनासाठी निवड होत असून २०१३ पासून १६ छात्रांनी राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या वर्षी निवड झालेली ऐश्वर्या खैरनार ही छात्रा मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आहे.

 

पद्मभूषण आबासाहेब गरवारे यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मएसो आबासाहेब गरवारे कॉलेज आणि मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास यशस्वी मराठी उद्योगिनी व 'पूर्णब्रह्म' या सर्वात मोठ्या मराठमोळ्या हॉटेल शृंखलेच्या संचालिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर 'पूर्णब्रह्म' च्या जागतिक प्रमुख वृषाली शिरसाव या देखील उपस्थित होत्या. याप्रसंगी दोन्ही महाविद्यालयातील वर्ष २०१७-२०१८ मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा सौ. कठाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. “कशालाही न घाबरता सचोटीने आणि आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुनिश्चित वाटचाल” हा यशाचा मूलमंत्र सौ. कठाळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी अतिशय रंजक शैलीत, प्रभावीपणे केलेले अनुभवकथनाने सर्व श्रोते भारावून गेले. 

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे दरवर्षी कै. आबासाहेब गरवारे यांचा जयंतीदिन ‘उद्योजकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यानिमित्त दोन दिवसीय राज्यस्तरीय बिझनेस फेयर (उद्योग मेळावा) आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सौ. कठाळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात, महाविद्यालयांत गेल्या १६ वर्षांपासून उद्योजकता विकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. गीता आचार्य यांच्या प्रयत्नांचा गौरव केला तसेच मूल्याधिष्ठित शिक्षणातून सकस समाज निर्मितीसाठी म.ए. सो. सारख्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.बी. बुचडे यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थचे सचिव व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी तसेच गरवारे ट्रस्टतर्फे मा. श्री. सुनील सुतावणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजकता विकास केंद्रप्रमुख डॉ. अर्चना जोशी यांनी तर आभार प्रदर्शन कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. भूषण राठोड यांनी केले.


 

© 2016

Search